भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव उत्साहात   

टिळकवाडा ते शनिवारवाडा मिरवणुकीने अभिवादन!

पुणे : भगवान परशुराम की जय... जय परशुराम.. सियावर रामचंद्र की जय.. जय श्रीराम... अशा जयघोषात आणि ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या गजरात  भगवान श्री परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त मध्य पुण्यात रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. हिंदू समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन ही मिरवणूक निघाली. 
 
टिळकवाड्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘केसरी’चे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, खासदार मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमान्य टिळक विचार मंचाचे अध्यक्ष शैलेश टिळक, भाजपचे नेते राजेश पांडे, संदीप खर्डेकर, भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे प्रमुख पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी,  मंदार जोशी, सूर्यकांत पाठक, विश्वजीत देशपांडे, मकरंद माणकीकर यांसह चैतन्य जोशी, मनोज पंचारिया, मयुरेश अरगडे, विश्वनाथ भालेराव, श्रीकांत जोशी, श्यामराव कुलकर्णी आदी उपस्थित होते. शनिवारवाड्यावर  मिरवणुकीचा समारोप झाला. 
 
मिरवणुकीत अग्रभागी चौघडा रथ त्यापाठोपाठ जगदंब वाद्य पथक, बाल व युवा वारकर्‍यांचे पथक, पारंपरिक वेशातील महिला आणि श्री परशुराम रथ सहभागी झाला होता. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. संपूर्ण मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळी व पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, हिंदूंनी एक झाले पाहिजे. जातीभेदाच्या भिंती तोडून आपण एकत्र यायला हवे. पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सर्तक राहायला हवे. आपल्यातील जातीभेद विसरून आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. देशासाठी आपण एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या दुर्देवी घटनेमुळे आपण एकत्र राहिलो तरच सुरक्षित राहू हा भाव सगळ्यांमध्ये येत आहे. जात माना, हे कुठेही म्हटलेलं नाही. आपण सगळे एकत्र आलो, तर आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिमंत होणार नाही, असेही ते म्हणाले. भगवान परशुराम जन्मोत्सव समिती पुणे च्या अंतर्गत ३० हून अधिक संस्था व संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

Related Articles